'राष्ट्रीय पोषण महिन्या'चा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याहस्ते शुभारंभ - दैनिक शिवस्वराज्य

'राष्ट्रीय पोषण महिन्या'चा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याहस्ते शुभारंभ



समीर शेख प्रतीनिधी
कोल्हापूर, दि. 1 : महिला आणि बाल विकास विभागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत पोषण अभियानांतर्गत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अखेर साजरा करण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय पोषण महिन्याचा' शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, सीपीआर व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पोषण समन्वयक आदी उपस्थित होते.
      दरम्यान 'जिल्हा पोषण अभिसरण कृती आराखडा' विषयी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री पवार म्हणाले, कोविड- 19 च्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये विविध उपक्रम आयोजित करावेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करावे. जिल्ह्यातील बालकांना पुरेसा, दर्जेदार आहार नियमितपणे मिळावा तसेच एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन श्री. पवार म्हणाले, सर्व बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करून यातील तीव्र आणि मध्यम कुपोषित, दुर्धर, दीर्घकाळ आजारी बालके शोधून त्यांच्यासाठी योग्य संदर्भ सेवा व उपचार, तसेच घरीच दर 2 तासांनी पौष्टिक आहार देऊन पोषण श्रेणीची देखरेख करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय पोषण महिन्यात संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने विविध उपक्रम राबवून डॅशबोर्डवर नोंदी घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
      शिल्पा पाटील यांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आणि डेल्टा व्हेरिएंट प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रामुख्याने सर्व गर्भवती स्त्रियांसाठी प्रत्येक सोमवारी 4 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात स्पॉट रजिस्ट्रेशन करून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. शिवाय स्तनदा मातांसाठी नियमित ऑनलाइन नोंदणी करून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुविधा करण्यात येत असून पोषण महिन्यात 100 टक्के गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मतांचे लसीकरण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. पोषण महिन्यामध्ये  

कोविड प्रतिबंधात्मक दक्षता घेत गृहभेटी आणि सोशल मीडिया द्वारे बाळाचे पहिले एक हजार  दिवस, कुपोषण निर्मूलन, ऍनिमिया मुक्ती, स्वच्छता आणि विविधतापूर्ण आहार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी आभार मानले. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा पोषण जनजागृतीसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत सर्वांना 8080809063 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणीही हा क्रमांक डायल केल्यास तात्काळ एसएमएस प्राप्त होतो आणि व्हाट्सप वर आपल्याला विविध पोषण, आरोग्य व आहार, कोविड प्रतिबंध संबंधीत वयोगटनिहाय विषयांची यादी पाठवली जाते. यातील आपल्याला अपेक्षित विषय क्रमांक टाकल्यास, तात्काळ त्या विषयाची सर्व सखोल माहिती आणि व्हिडिओ पाठवले जातात. यामधील माहिती तसेच पौष्टिक पाककृती व्हिडिओ, माहिती नियमित अद्ययावत होत राहते. अधिकाधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रचार करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिल्या.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads